ऐतिहासिक माहिती
इतिहास आणि बदल
देगलूर तालुक्यातील येरगी हे गाव महाराष्ट्र ,कर्नाटक, तेलंगणा सिमेवर असून ,हे गाव पुरातत्त्वीय व ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे आहे. येथे पाच चालुक्यकालीन शिलालेख व आता नव्याने आढळून आलेला एक असे एकूण सहा शिलालेख आहेत. नविन शिलालेख आढळून आल्यामुळे मागील एक वर्षामध्ये या येरगी गावाला चार- पाच वेळेस विषयतज्ञांनी भेट देऊन ऐतिहासिक वास्तूंची पाहणी केली. या गावमध्ये दोन पुरातण बारव ह्या मागील 25 ते 30 वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी गावतील कचरा टाकल्यामुळे तसेच परीसरात झाडेझुडपे वाढल्यामुळे पुर्ण बुजलेल्या अवस्थेत होत्या. गावतील सरपंच यांना या पुरातन वारस्याबाबत माहिती दिल्यामुळे, तिचे 12 मार्च 2023 रोजी ग्रामस्थां सोबत, नायब तहसीलदार श्री. मकरंद दिवाकर, नांदेड इंटँक चे श्री. सुरेश जोधळे, पुरातत्त्व संशोधक डॉ. कामाजी डक, सरपंच श्री. संतोष पाटील, ग्रामसेवक श्री. राजेश तोटावार यांनी पाहणी केली. व या ठिकाणी साफसफाईच्या कामा संबंधाने नियोजन करण्यात आले. कुठल्याही पुरातत्व अनुषंगाने असलेल्या मुर्ती, दगडी कामे यांना न हलविता सदरील साफसफाई करण्याचे नियोजीत करण्यात आले. मागील दहा दिवसामध्ये या गावातील मारोती मंदिराच्या बाजूला असलेली बारव सरपंच संतोष पाटील यांनी स्वतः आर्थिक भार पेलत पुर्ण स्वच्छ करण्याच्या कामी पुढाकार घेतला. या बारव मधला जसा जसा कचरा व घाण उपसा सुरु झाला तसे तसे तळातील पाण्याच्या झऱ्यांनी मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली. हे पाहूण ग्रामस्थांमधील जुणी जाणती जेष्ठ व्यक्तींनी, सन १९८० ला या बारवेतून आम्ही पाणी भरत होतो असे सांगण्यास सुरुवात केली. याचाच परिणाम पाहता येरगी गावातील दुसरी बारव स्वच्छतेचे काम देखील सुरु करण्यात आले आहे. येरगी गावामध्ये चार मंदिरांचे अवशेष, शिल्प, दोन बारवा व मोठ्या प्रमाणावर आड आहेत. आडांची स्थिती व्यवस्थित असून आज देखील लोक या आडातील पाण्याचा वापर करतात. होट्टल येथे कार्यशाळा व येरगी येथे तत्कालीन नागरीकांची वस्ती असावी असा कयास विषयतज्ञांनी मांडला. तत्कालीन ग्रामस्थांना व पुढील पिढींसाठी कायमस्वरुपी पाणी उपलब्धतेच्या अनुषंगाने, बांधण्यात आलेल्या आड, बारव, विहिरी हा अभ्यासाचा विषय बनला आहे. आधूनिक नागरीकरनास देखील मात करेल असे नियोजन पाण्याचे त्याकाळातील नगर बसवणाऱ्यांनी केले आहे. त्याचाच परिपाक म्हणजे आज घडीस देखील या गावात पाण्याचा दुष्काळ , प्रादुर्भाव जाणवलेला नाही. येरगी गावामध्ये असलेल्या दोण्ही बारवांची स्थिती आज मितीस वाईट स्थितीत आहे. त्यांचे संवर्धन झाल्यास निश्चीतच त्या ठिकाणी पाण्याचा मोठा स्त्रोत ग्रामस्थांना उपलब्ध होऊ शकतो. गावातील लोकांनी या बारवांचा उपयोग कचराकुंडी म्हणूनच केला होता. त्यांना या चालुक्यकालीन बारवांचे महत्त्व नसावे. या संदर्भात गावचे सरपंच श्री. संतोष पाटील यांच्यासोबत बऱ्याच वेळेस गावातील या दोन्ही बारवा स्वच्छ करणे कशा आवश्यक आहे यासंदर्भात चर्चा केली. त्यांनी गावचा हा ठेवा अनमोल आहे. त्यामुळे तो चांगला राहिला पाहिजे होट्टलला येणारे पर्यटन येरगीला देखील आले पाहिजे पर्यायाने पर्यटनाला देखील चालना मिळेल. गावातील पाणी व्यवस्थापनाचे धडे आधूनिक नगर रचने करीता कसे मार्गदर्शक ठरु शकतील याचा सातत्याने विचार केला. परंतू म्हणतात ना सोनारानेच कान टोचावेत. त्या उक्ती प्रमाणे प्रशासन व तांत्रिक ज्ञान असलेल्या समावेशक अशा टिमला घेवून ज्यात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार श्री. दिवाकर मकरंद, पुरातत्त्व विषयाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाड विद्यापिठातील अभ्यासक डॉ. कामाजी डक, कला शिक्षक श्री. गजानन सुरकुटवार, गावचे सरपंच श्री. संतोष पाटील व ग्रामसेवक श्री. राजेश तोटावार यांनी दिनांक १२ मार्च,२०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत येरगी गावाची पाहणी केली. यावेळी सोबत गावकरी पण होते. यावेळी गावातील सरस्वतीची मूर्ती व सप्तमातृकापट व्यवस्थित पाण्यानी धुवून घेतला. यानंतर बारवांची पाहणी करण्यास सुरूवात केली. अवतीभोवती असलेली झाडे, गावकऱ्यांनी टाकलेला कचरा यामुळे व्यवस्थित पाहता देखील येत नव्हते. यावेळी गावातील मारोती मंदिरासमोर ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्याच ऐतिहासिक वारशाची महती दिली. ज्यास ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज दिनांक १ एप्रिल, २०२३ रोजी पुन्हा नायब तहसीलदार श्री. मकरंद दिवाकर, नांदेड इंटँक चे श्री. सुरेश जोधळे, पुरातत्त्व संशोधन डॉ. कामाजी डक, पत्रकार श्री. शिवानंद स्वामी, सरपंच श्री. संतोष पाटील, ग्रामसेवक श्री. राजेश तोटावार यांनी येरगी येथे भेट देऊन या कामाची पाहणी केली. तसेच बारव व पुरातण अवशेष सभोवताचे झालेले अतिक्रमण काढण्या संदर्भात संबंधितांना सुचना दिल्या. महाराष्ट्रात बारव मोहिम मागिल दोन वर्षापासून बारव मोहीम जोरात सुरू असून श्री. रोहन काळे Rohan Kale यांनी या मोहिमेला गती दिली आहे. त्यामुळे बारवांचे जतन व संवर्धन झाले पाहिजे यासाठी बरेच लोक समोर आले आहेत. महाराष्ट्राभर ही मोहीम सध्या सुरू असून यात बरीच लोक सहभागी झाले आहेत. श्री. अमोल गोटे, Amol Gote सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग, नांदेड यांचे देखील वेळेवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. येरगीतील बारव व आड हा सांस्कृतिक वारसा अभ्यासण्यासाठी जिल्ह्यातील विषय तज्ञांसह पुनश्च येत्या महिण्याभरात गावास भेट देण्याचे नियोजन करण्यात आले.
ग्रामपंचायत — संचलन, जबाबदाऱ्या आणि स्थानिक प्रशासन
स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत कार्यालय येरगी दर आठवड्याला स्वच्छता अभियान राबविले जाते.
लोकसंख्या, समाजरचना व सांगाडा आकडे
2011 च्या जनगणनेनुसार, येरगी लोकसंख्या 1787 घरांची संख्या 355 आहे. लिंग गुणोत्तर, महिला 915 पुरुष 872 बालसंख्या 211 व समाजवर्ग यांचे तपशील उपलब्ध आहेत.
शिक्षण आणि संस्था
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 01 अंगणवाडी केंद्र 03
आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संपर्क
आरोग्य उपकेंद्र येरगी 01 पोस्ट आफिस , नियोजित पोलिस स्टेशन मंजूर आहे. तलाठी सज्जा पण आहे.
धार्मिक-सांस्कृतिक जीवन आणि उत्सव
येरगी, ता. देगलूर जि. नांदेड येथे आणखी एक चाळुक्यकालीन शिलालेख नव्याने आढळला असून यात गोविंदरस व भमिकब्बे (चमिकब्बे) यांचा पुत्र पोचरस (बाचरस) याने केशवेश्वर (मितेश्वर) मंदिराला जाळीदार खिडकी व काही अन्य दान दिल्याचा उल्लेख आहे. देगलूर तालुक्यातील येरगी या गावात मारुती मंदिराच्या पाठीमागे पडझड झालेल्या स्थितीत एका मंदिराचे काही अवशेष आहेत. यात गर्भगृहाचे द्वार असून अंतराळाचे दोन स्तंभ व सभामंडपाच्या चार स्तंभावर हे मंदिर आज उभे आहे. या मंदिराची पाहणी करत असतांना पुरातत्त्व अभ्यासक डॉ. कामाजी रामजी डक यांना ललाटबिंबावर हा शिलालेख आढळून आला. तो पटकन नजरेस पडेल असा नसल्याने याकडे आजवर कोणाचे लक्ष गेले नव्हते असे दिसते. या द्वाराच्या ललाटबिंबावर गजलक्ष्मीचे शिल्प असून याच्या वरील द्वारपट्टीवर हा शिलालेख पाच भागामध्ये कोरण्यात आला आहे. या द्वारास एकच स्तंभ शाखा असून उंची साधारण ६ फुट असून रूंदी ४ फूट आहे. तसेच बाजूला जालवातायन आहे. या शिलालेखाचे अस्तित्व कोणी नोंदविलेले दिसून आले नाही व त्याचे वाचन कोणी केलेले आढळून आले नसल्यामुळे पुरातत्वाचे अभ्यासक डॉ. कामाजी रामजी डक यांनी त्याचे ठसे घेतले. या हळ्ळेकन्नड शिलालेखाचे प्राथमिक वाचन डॉ. प्रा. बाळकृष्ण हेगडे, Balakrishna Hegde शिवमोगा यांनी केले तर यानंतर अधिक सुस्पष्ट ठशाच्या सहाय्याने Shashidhara Hg शशीधर एच. जी. यांनी शिलालेखाचे पूर्ण वाचन केले. तर Ravikumar K Navalagunda यांनी ही थोडेसे विभिन्न वाचन उपलब्ध करून दिले आहे. ते वर कंसात दिले आहे. तर याचा संस्कृत व मराठी अर्थ इतिहास संशोधक डॉ. नीरज साळुंखे यांनी केला आहे. द्वारपट्टीवर पाच भागात असलेल्या या शिलालेखाची सुरुवात स्वस्ती श्री मदगोविंदरस पत्नी अशी करण्यात आली असून दुसऱ्या ओळीत भ(च)मिकब्बे (पोचरसाची/बाचरसाची आई) चा उल्लेख आला आहे. तर तिसऱ्या ओळीत राजकुमार पोचरसाने(बाचरसाने) केशवेश्वर मंदिराला दान दिल्याचा उल्लेख आहे. रस म्हणजे राजा ,राजपुरुष , सामंत होय. चौथ्या ओळीत उपासनेचा उल्लेख आहे. तर पाचव्या ओळीत जाळान्द्रव(जालांद्र) असा उल्लेख आला आहे. जाळान्द्र म्हणजे कन्नडमध्ये जालवातायन म्हणजेच जाळीदार खिडकी होय. *एकंदरीत गोविंदरस व भ(च)मिकब्बे यांचा पुत्र पोचरस(बाचरस) याने केशवेश्वर(मितेश्वर) मंदिराला जाळीदार खिडकी व काही अन्य दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आला आहे.* प्राप्तीस्थळ : येरगी येथील मंदिराच्या द्वारपट्टीवर हा शिलालेख आहे. भाषा संस्कृतप्रभाव असणारी हळेकन्नड, लिपी- हळेकन्नडलिपी व्यक्तीनामे : गोविंदरस, भमिकब्बे/चमिकब्बे, पोचरस/बाचरस राजवंश :- भूलोकमल्ल सोमेश्वर तिसरा, कल्याणी चाळुक्य व त्याचे सामंत, वर्ष/तिथी स्पष्ट उल्लेख नाही, इ.स. बारावे शतक, पण इस ११३८ सुचवत आहे. शिलालेखात उल्लेखित गोविंदरस, भमिकब्बे /व राजकुमार पोचरस/बाचरस यांचा परिसरातील इतर शिलालेखात आलेल्या व्यक्तीनामाशी काही संबंध मिळतो का यावरून निश्चित काळ ठरविण्याचे संशोधन ही डॉ नीरज साळुंखे यांनी पुढीलप्रमाणे केलं आहे. येरगी हे चाळुक्य काळात "अग्रहार" होते. अग्रहार हे राजाने ब्राह्मणांना दिलेले करमुक्त गाव वतन असे. २३ जुलै ११२३ च्या येरगी येथील शिलालेखात गोविंदरस याचा उल्लेख आला असून त्याद्वारे ह्या नव्या शिलालेखात त्याच्या मुलाचा उल्लेख असल्याने हा शिलालेख इस ११२३ नंतर हे नक्की. तर येरगी येथीलच अन्य एका शिलालेखात इस ११३८ ला महामंडळेश्वर एरम्मरस याने ( मूलतः वेण्णनायक याने बांधलेल्या) मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीसाठी उक्कलगाव येथून काही उत्पन्न लावून दिले आहे. शक्यता आहे की तेव्हाच वा अन्य एका शिलालेखात याच गावातील मंदिर दुरुस्तीसाठी दाने इस ११४९ ला दिली असल्याचे दिसते, यापैकी एकदा पोचरस/बाचरस याने जाळीच्या कामाचा वाटा उचलला हे दिसते. तूर्तास गाभारा व जाळी यांची रचना पाहता इस ११३८ असा आपण या नव्या लेखाचा काळ धरावा. आधीच्या शिलालेखात वेण्णमय्यानायक हा गोविंदरस याचा पुत्र असून त्यानेच केशवदेवाचे मंदिर बांधले व येरगी च्या अन्य ग्रामस्थांनी विविध दाने दिली व गोविंदरस याचा अन्य एक पुत्र आचरस याने ही दाने दिली असे स्पष्ट होते. याचाच अर्थ या नव्या शिलालेखामुळे आपणांस गोविंदरस याचा आणखी एक पुत्र पोचरस किंवा बाचरस हा होता, गोविंदरस याची पत्नी भमिक(ब्बे) या नावाची होती ही नवी माहिती मिळते. गोविंदरस व भमिकब्बे/चमिकब्बे यांना वेण्णमनायक, आचरस व पोचरस/बाचरस असे पुत्र होते हे यामुळे स्पष्ट होते. कंसात वाचन रविकुमार यांचे आहे. यासाठी इतिहास विभागप्रमुख डॉ. पुष्पा गायकवाड, येरगी गावचे सरपंच संतोष पाटील, श्री. कृष्णा गुडदे, श्री.सुरेश जोंधळे, श्री.ज्ञानोबा शिखरे यांनी देखील सहकार्य केले. ऐरगी हे गाव होट्टलपासून दक्षिणेस सुमारे ५ कि. मी अंतरावर असून ऐतिहासिक व पुरातत्वीय दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या गावात कल्याण चाळुक्यकालीन पाच शिलालेख आढळले असुन यांचे वाचन डॉ. श्रीनिवास रिट्टी व श्री. जी. सी. शेळके यांनी "Inscription from Nanded District" या ग्रंथात प्रकाशित केले आहेत. नांदेड परीसरात ४० च्या वर चालुक्यकालीन शिलालेखाची माहिती या ग्रंथात देण्यात आली आहे. या शिलालेखावरून चाळुक्य राजवटीत नांदेड परीसराला महत्त्वाचे स्थान लाभले होते हे कळते. ऐरगी या ठिकाणी शैक्षणिक केंद्राप्रमाणे त्रैपुरूषदेव (ब्रह्मा, विष्णु व महेश) मंदिर बांधण्यात आले होते असा उल्लेख होट्टल येथील शिलालेखात आढळतो. याशिवाय शिलालेखांत उल्लेखिल्याप्रमाणे येथे केशवदेव व नागेश्वर यांचीही देवालये होती. *नविन शिलालेखात देखील केशवेश्वर/मितेश्वर मंदिराचा उल्लेख आला आहे.* तसेच या गावात चार मंदिराचे अवशेष बरीच शिल्पे देखील आढळून येतात. मारुती मंदिराच्या सभामंडपात ही शिल्पे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने सुर्य, उमामहेश्वर, लक्ष्मीनारायण, गणेश, ब्रह्मा इत्यादी देवतांची अप्रतिम शिल्पे आहेत. तसेच एका मंदिराच्या गर्भगृहात सरस्वतीची सुंदर शिल्प असून या मूर्तीच्या पाठीमागे चाळुक्यांचे विशेष वैशिष्ट्य असणारा सप्तमातृकापट ठेवण्यात आला आहे. तसेच गावात दोन पुष्करणी व छोटे आड आढळून येतात.